प्रदूषण रोखण्यासह इंधन बचतीसाठी ‘संरक्षण क्षमता’तून जनजागृती
![Awareness from ‘protection potential’ for fuel saving including pollution prevention](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/press-१०१०१.jpg)
पुणे :- विनाकारण इंधन वापरल्यामुळे वाहनातून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनामुळे हवेतील प्रदुषणासह पर्यावरणाचा समतोल ढळतो. त्यामुळे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी इंधन बचतीचा संदेश देत 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान संरक्षण क्षमता महिना साजरा केला जात असल्याची माहिती हिंदुस्तान पेट्रोलियमचे वरिष्ठ प्रादेशिक विक्री व्यवस्थापक मंगेश डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे लष्कर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम पुणे विभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नोडल अधिकारी चित्रा नायर उपस्थित होत्या.डोंगरे म्हणाले, हवेतील कार्बनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. इंधनाच्या प्रज्ज्वलनातून हवेचे प्रदुषण वाढते. पर्यावरण संवर्धन इंधनाचा कमी वापर करण्यासंदर्भात जनजागृती आणि प्रबोधनासाठी देशव्यापी संरक्षण क्षमता महिना(संक्षम) 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जात आहे.
यामध्ये शाळा, महाविद्यालयात इंधन संवर्धन चित्रकला स्पर्धा, पेट्रोल पंप, गॅस एजन्सीत कार्यशाळा, पथनाट्यातून जनजागर, ड्रायव्हिंग स्पर्धा, टिव्ही रेडीयोवर चर्चा असे विविध उपक्रम राज्यभरात राबविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.