पुण्यात कोव्हिड रुग्णालयात खासगी डॉक्टरांना 15 दिवस सेवासक्ती, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे : पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. पुण्यात आता खासगी डॉक्टरांनाही कोव्हिड 19 सेंटर, कोव्हिड 19 रुग्णालयात 15 दिवस सेवासक्ती द्यावी लागणार आहे. जे डॉक्टर सेवा देणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी डॉक्टरांना आता कोव्हिड 19 सेंटरमध्ये सक्तीने 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. या आदेशातून 55 वर्षांवरील आणि काही आजार असलेले डॉक्टर वगळण्यात आले आहेत. तुम्ही कुठे सेवा देणार यासंदर्भात येत्या तीन दिवसात डॉक्टरांनी माहिती द्यावी, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुणे शहरात सध्या कोव्हिड 19 सेंटर वाढवण्यात आले असून त्यासाठी पालिकेकडे डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे खासगी डॉक्टरांना आता 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे. यासंदर्भात पुणे, पिंपरी पालिका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.