पुण्याच्या बाहेरून उपचारासाठी दाखल होणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या 30 टक्के
पुण्यात जवळच्या चार जिल्ह्यांतून करोना बाधित रुग्ण येत असल्याने येथील आरोग्यव्यवस्थेवर सध्या प्रचंड ताण आहे. हा ताण पुढच्या काही दिवसांत कमी होणार आहे. त्याबाबत महत्त्वाची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पुणे शहराबाहेरून उपचारासाठी दाखल होणाऱ्या करोना बाधित रुग्णांची संख्या सुमारे ३० टक्के असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर उभारण्यात येणार आहेत. पाच ऑक्टोबरपर्यंत ही सेंटर सुरू झाल्यावर पुण्यात खाटा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उपचाराची व्यवस्था नसल्याने अनेक रुग्ण हे पुण्यात दाखल होत आहेत. हे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. त्यामुळे होणारा ताण कमी करण्यासाठी या चार जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर उभारण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
राव म्हणाले, ‘सांगलीतील क्रीडा संकुलावर ११० ऑक्सिजनयुक्त आणि ५० आयसीयू खाटांची व्यवस्था असणारे तात्पुरते करोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यासाठी कराड येथे जम्बो सेंटर सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही जम्बो सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत चारही जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर सुरू होणार आहेत.’
‘या चार जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर सुरू झाल्यानंतर या जिल्ह्यांतील रुग्णांची उपचाराची व्यवस्था होणार आहे. त्यामुळे पुण्यातील आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होऊ शकणार आहे’ असे राव यांनी स्पष्ट केले.