पुणे शहरात पोलीस संरक्षणात पालिका बसविणार पाणी मीटर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pmc-.jpg)
- पाणीपुरवठा विभागाची माहिती
पुणे : शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बसवलेले पाणी मीटर काही व्यावसायिक व नागरिकांकडून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला़. यामुळे पालिका प्रशासनाकडून काढलेले हे ३०० पाणी मीटर पुन्हा तेही पोलीस संरक्षणात बसविणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या वतीने शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे़. याद्वारे नागरिकांना मुबलक व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याचा मानस असून, या योजनेसाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरू असून, पाण्याची गळती रोखण्यासाठी शहरातील जुनी पाईपलाईन बदलून, १,८०० किलोमीटर लांबीची नवीन पाईपलाईन टाकली जाईल. तसेच, नवीन १०३ पाण्याच्या टाक्याही बांधण्यात येतील. यापैकी पहिल्या टप्प्यात ८२ टाक्या उभारल्या जातील़.
याबाबत माहिती देताना कुलकर्णी म्हणाले, की या योजनेअंंतर्गत संपूर्ण शहरात मीटरने पाणीपुरवठा करणार आहे. याकरिता पाणी मीटर बसविण्याचे कामसुद्धा करण्यात येत आहे. परंतु, गेल्या महिन्यामध्ये ठेकदाराकडून बसवलेले ३०० मीटर काही नागरिकांकडून तसेच व्यावसायिकांकडून काढून टाकल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे आता हे मीटर पोलीस संरक्षणात बसवण्यात येणार आहेत.