पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला देणार सोडचिठ्ठी ?
![Jana Aashirwad Yatra of four Union Ministers from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/BJP-2.jpg)
– राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील 19 नगरसेवक भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. या चर्चेने शहर भाजपात अस्वस्थता पसरली आहे. तर हि बातमी अफवा असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेते सांगत आहेत. त्यामुळे नेमके चित्र काय, असा गोंधळ पदाधिकार्यांना पडला आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपा आपणचं नंबर वन असल्याचा दावा करत आहे. राज्यात ५ हजार ७०० हून अधिक ग्रामपंचायतीवर भाजपाने सत्ता आणल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडीला ग्रामीण जनतेने कौल दिला आहे असे सत्ताधारी पक्षाचे नेते सांगत आहेत. ग्रामपंचायत निकालांचे दावे-प्रतिदावे केले जात असताना यातच या नव्या चर्चेने राजकीय नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरवली आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला मोठं यश मिळालं होतं. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसेतून मोठी इनकमिंग भाजपात झाली होती. मात्र यातीलच काही नगरसेवक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चर्चांना अफवा असल्याचे सांगत वरिष्ठ नेत्यांनी या वृत्ताचे खंडन केले आहे. भाजपाचा एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांमध्ये काही तथ्य नाही. कुणीतरी मुद्दाम अशाप्रकारे बातम्या पसरवत आहेत, ज्यात काही निष्पन्न होणार नसल्याचे भाजपचे नेते सांगत आहेत.