पुणे विभागात कोरोना मुक्तीचा वेग वाढला, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60.86 टक्के
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Screenshot_20200712_103653-1.jpg)
पुणे – पुणे विभागात आतापर्यंत सापडलेल्या करोना बाधितांपैकी निम्म्याहून अधिक ठणठणीत बरे झाले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत पुणे शहरासह अन्य जिल्ह्यांमध्ये स्वॅब तपासणी संख्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत असताना, दुसरीकडे बरे होणाऱ्यांची संख्याही वाढत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळला आहे. आतापर्यंत 45 हजार 897 बाधितांपैकी 27 हजार 931 जण करोनामुक्त झाले. विभागात बरे होण्याचे प्रमाण 60.86 टक्के असून, गेल्या 24 तासांत हे प्रमाणात वाढले आहे.
विभागातील मृत्यू दर कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाकडून नेहमीच बोलले जाते. मात्र, स्वॅब तपासणीच्या तुलनेत मृत्यू दर 3.23 टक्के इतका आहे. विभागात आतापर्यंत
1 हजार 483 बाधितांचा मृत्यू झाला असून, 731 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. सध्या विभागात (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर) एकूण 16 हजार 483 बाधित उपचार घेत आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येत सर्वाधिक मृत्यूची नोंद पुणे जिल्ह्यात 1 हजार 50 इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येने 38 हजार 473 चा टप्पा पार केला असून, त्यातील 23 हजार 591 बाधित बरे होवून घरी गेले आहेत. 13 हजार 832 बाधितांवर उपचार सुरू असल्याचे विभागीय आयुक्त यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण मागील पंधरा दिवसांत 1 टक्क्याने वाढले आहे. सध्या 61.32, तर मृत्यूचे प्रमाण 2.73 टक्के इतके आहे. दरम्यान, आजपर्यंत विभागामध्ये एकूण 2 लाख 39 हजार 852 नमूने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 2 लाख 34 हजार 207 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. तर 5 हजार 645 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 87 हजार 860 नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 45 हजार 897 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.