पुणे विद्यापीठात आजपासून जागतिक घुबड परिषद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/pun04-.jpg)
- भारताला पहिल्यांदाच मान
पुणे : अंधश्रद्धा, धार्मिक समजुती आदी कारणांमुळे कमी होत असलेल्या घुबडांविषयी जनजागृती करण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी सहावी जागतिक घुबड परिषद शुक्रवार (२९ नोव्हेंबर) आणि शनिवारी (३० नोव्हेंबर) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होत आहे. या परिषदेत १६ देशांतील अभ्यासकांचा सहभाग असून, चर्चा, व्याख्याने, प्रदर्शन असे विविध कार्यक्रम या निमित्ताने होणार आहेत.
इला फाउंडेशनचे डॉ. सतीश पांडे यांनी ही माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवशास्त्र विभाग आणि पर्यावरणशास्त्र विभागाने या परिषदेच्या आयोजनासाठी सहकार्य केले आहे. घुबडांविषयी शास्त्रीय माहितीचे आदानप्रदान, अधिवास, विविध देशांतील संस्कृतीतील घुबडांचे स्थान अशा विषयांवर परिषदेत चर्चा केली जाईल. ‘आऊल्स ऑफ द वर्ल्ड’सारखे ग्रंथ लिहिलेले जेम्स डंकन यांच्यासारखे नामवंत संशोधक परिषदेत सहभागी होणार आहेत. अभ्यासकांच्या चर्चासह विद्यार्थ्यांसाठीची परिषद होणार आहे. त्यात विद्यार्थ्यांशी अभ्यासक संवाद साधणार आहेत.
‘परिषदेच्या आयोजनाचा मान पहिल्यांदाच भारताला मिळाला आहे. या पूर्वीची परिषद पोर्तुगालमध्ये झाली होती. संवर्धनासाठी संशोधन आणि जनजागृती होणे आवश्यक असते. या दोन्हीला चालना देण्याचा परिषदेचा प्रयत्न आहे. या परिषदेनंतर मंगळवार (३ डिसेंबर) आणि बुधवारी (४ डिसेंबर) पिंगोरी येथे उलुक महोत्सव होणार आहे,’ असेही पांडे यांनी सांगितले.