पुणे-मुंबई द्रुतगतीवर सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांना बसणार चाप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/5-12.jpg)
वाहनचालकांना आता एक हजार रुपयांचा दंड बसणार
पुणे |महाईन्यूज|
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सुसाट जाणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. द्रुतगती मार्गावर सुसाट गाडी चालविल्यास आणि दोन टोलनाक्यांमधील ५० किलोमीटर अंतर ३७ मिनिटांत पूर्ण केल्यास वाहनचालकांना आता एक हजार रुपयांचा दंड बसणार आहे.
द्रुतगती मार्गावर अपघातांची सरासरी सध्या जरी कमी झाली असली, तरी सर्वाधिक अपघात हे अतिवेगामुळे होत असल्याचा निष्कर्ष आहे. राज्यातील अपघातांची संख्या तसेच, मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उपाययोजना करण्यात येत आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये महामंडळाच्या वतीने अधिसूचना काढत पुणे-मुंबई दरम्यान ९४ किलोमीटर लांबीच्या मार्गावर वेगमर्यादा वाढविण्यात आली. हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किलोमीटर व अवजड वाहनांसाठी ८० किमी प्रति तास वेग मर्यादा निश्चित करण्यात आली. तर बोरघाटात १५ किमी रस्त्यांसाठी ताशी ५० इतकी वेगमर्यादा आहे.
मात्र, तरीही चालक वेग मर्यादेचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता खालापूर ते उर्से टोल नाक्यादरम्यानच्या अंतरावर महामार्ग पोलिसांची करडी नजर असेल. महामार्ग पोलिस आणि रस्ते विकास महामंडळाच्या वतीने वेगमर्यादा वाढविण्यात आली असली, तरी दुसरीकडे द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडाची पावती फाटणार आहे.