पुणे, पिंपरीत शिवभोजन थाळ्यांच्या संख्येत वाढ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/shiv-bhojan-thali.jpg)
पुणे | महाईन्यूज
गरिबांना अल्पदरात जेवण देण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मिळून ११ ठिकाणी शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, मर्यादित थाळ्या आणि जेवणाऱ्यांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने थाळ्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यात सात ठिकाणी एक हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणी पाचशे अशा एकूण १५०० थाळ्या पुण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. सध्या साडेअकराशे थाळ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत.
राज्य सरकारने याबाबतचे आदेश मंगळवारी प्रसृत केले. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. या योजनेचे २६ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतील उपाहारगृहात उद्घाटन करण्यात आले होते. योजनेला पहिल्या दिवसापासूनच पुण्यात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. योजनेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ जानेवारीला जेवणासाठी झुंबड उडून मार्केट यार्ड येथील केंद्रावर हाणामारीचा प्रसंग उद्भवला होता. त्यामुळे पुण्यातील केंद्रे आणि त्यातील थाळ्यांची संख्या वाढवण्याची मागणी झाली होती. त्यानुसार राज्य सरकारने शासन आदेश प्रसृत केला आहे.
पुण्यात एक हजार आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पाचशे अशी एकूण प्रतिदिन १५०० थाळ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुण्यातील सात केंद्रांवर प्रत्येकी १४३ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये चार केंद्रांवर प्रत्येकी १२५ थाळ्या मिळणार आहेत. या योजने अंतर्गत गरिबांना दहा रुपयांत जेवण उपलब्ध आहे. आगामी काळात बचतगट, खाणावळी, भोजनालये येथे ही योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जेवण घेणाऱ्याचे छायाचित्र, नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात येतो आहे.