पुणे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन
![Strict restrictions again in Sangli; Tea, paan tapari, stall closed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/lockdown1-pti-1-1594004034-1594391216.jpg)
पुणे – कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील खेड, चाकण, आळंदी व ग्रामीण भागात 360 च्यावर रुग्णांची संख्या गेली आहे. प्रशासनाकडून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून ज्या गावात पाच पेक्षा आधिक रुग्ण असतील त्या शहर व गावात सोमवार दिनांक 13 पासुन पुढील दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिल्या आहेत.
राजगुरुनगर, चाकण, आळंदी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. खेड तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोना रुग्नांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी वैद्यकीय सेवा वगळता कडक लॉकडाऊन करण्याच्या सूचना बैठकीत प्रांतधिकारी संजय तेली यांनी दिल्या.
यावेळी आमदार दिलीप मोहिते-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सभापती अंकुश राक्षे, उपविभागिय पोलीस अधिकारी गजानन टोंम्पे, चाकण राजगुरुनगर आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी, पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी उपस्थित होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून महाळुंगे येथील कोविड सेंटर क्षमता वाढवून चाकण,राजगुरुनगर येथे कोविड सेंटर तयार करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.
दरम्यान, चाकण येथील कोविड सेंटरची क्षमता लवकर संपण्याची शक्यता असताना खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यानुसार ग्रामीण आरोग्य केंद्रात कोविड रुग्णालय उपचारासाठी सुसज्ज आणि पूर्ण कार्यक्षमतेने रुग्णालय सुरू करण्याची गरज आहे. तसेच अँम्बुलन्सचाही तुटवडा जाणवत असल्याने कोविड रुग्नाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचे स्वँब तातडीने घेऊन तपासणी तातडीने करण्याची गरज आहे.