पुणेकरांनी कोरोनाच्या विषाणूला घाबरण्याचे काम नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/9-15.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी
चीनमध्ये वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन संशयित मुंबईत आढळल्याने देशभरात या विषाणूची भिती निर्माण झाली आहे. खबरदारीच्या यापार्श्वभूमीवर पुण्यातील नायडू रुग्णालय आणि ससून रुग्णालयामध्ये विशेष वार्डची तयारी सुरु करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आरोग्य आयुक्तांनी दिली आहे. या रुग्णालयांमधील नर्सिंग कर्मचार्यांना आवश्यक खबरदारी आणि सुरक्षा प्रक्रियेसाठी प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात कोरोना विषाणू संसर्ग रुग्ण आढळलेला नसून त्याची शक्यताही कमी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सहाय्यक आरोग्य आयुक्त डॉ. संजय वावरे म्हणाले की, शहरातील सरकारी ससून रुग्णालयासह नायडू रुग्णाल्यात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची तयारी सुरु आहे. एका वार्डात अंदाजे ७ ते ८ रुग्णांसाठी इतर रुग्णांपासून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल. नर्सिंग कर्मचार्यांना या रूग्णांना हाताळण्यासंदर्भात प्रशिक्षणही दिले जाईल. त्या अनुषंगाने सुविधाही पुरविल्या जातील. मुंबई विमानतळावर चीन किंवा इतर ठिकाणावरुन येणाऱ्या प्रवाशांची तपासणी होत आहे. त्यामुळे शहरात असा रुग्ण आढळण्याची शक्यता कमी आहे, असेही त्यांनी सांगितले.