breaking-newsपुणे

नियोजनशून्य कारभाराचा असाही नमुना!

पुणे | महाईन्युज

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणाची आवश्यकता सातत्याने अधोरेखित झालेली असताना नेमक्या याच योजनेसाठीचा निधी अन्यत्र वळवण्यात आल्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा नमुना पुढे आला आहे. वाहतूक सक्षमीकरण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील विजेवर धावणाऱ्या गाडय़ांची खरेदी प्रक्रिया सुरू झालेली असताना या गाडय़ांसाठी अंदाजपत्रकात राखीव असलेल्या ३३ कोटी रुपयांच्या निधीतून प्रभागांमधील दैनंदिन स्वच्छतेची कामे केली जाणार आहेत. ई-बससाठीची तरतूद क्षेत्रीय कार्यालयांना ठेकेदारी पद्धतीने दैनंदिन झाडणकाम करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

दैनंदिन झाडणकामांसाठी अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद असतानाही विविध प्रकल्पांचा निधी या कामांसाठी वळविण्याची परंपरा कायम राहिली असून पुरेसा निधी असूनही तो अपुरा कसा पडतो, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. शहरात स्वच्छतेची दैनंदिन कामे ठेकेदारी पद्धतीने करून घेतली जातात. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना निधी दिला जातो. अंदाजपत्रकामध्ये त्यासाठी तरतूद केली जाते. मात्र आर्थिक वर्ष संपत आल्यानंतर क्षेत्रीय कार्यालयांकडून निधी अपुरा पडत असल्याचे नमूद करत अन्य प्रकल्पांचा निधी या कामांसाठी मागितला जातो. त्यानुसार सार्वजनिक रस्ते आणि प्रमुख चौकातील झाडणकाम करण्यासाठी ३३ कोटी ४६ लाख रुपये उपलब्ध करून द्यावेत, असा प्रस्ताव घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ठेवण्यात आला होता. त्याला मुख्य सभेनेही मंजुरी दिली आहे. हा निधी उपलब्ध करून देताना सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी असलेल्या निधीतून ही कामे करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button