breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नगरसेवक संदीप पवार खूनप्रकरणी ‘सरजी’ गॅंगला पोलीस कोठडी

  • मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांचा आदेश

  • पूर्ववैमनस्यातून झाला होता खून

पुणे – पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा कट रचून खून केल्या प्रकरणात सरजी गॅंगच्या म्होरक्‍यासह 9 जणांना संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) अटक करून पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना विशेष मोक्का न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी 19 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

या गॅंगचा म्होरक्‍या जिल्हा परिषद सदस्य गोपाळ बाजीराव अंकुशराव उर्फ सरजी (38, रा. आंबे ता. पंढरपूर, लिंकरोड पंढरपूर), त्याचे साथीदार आकाश हणुमंत बुराडे (20), रूपेश उर्फ लल्या दशरथ सुरवसे (21), सचिन भगावान वाघमारे (32, तिघेही रा. पंढरपूर) ओकांर नंदकुमार जाधव (22), प्रथमेश चंद्रकांत लोंढे (22), राहुल उर्फ पिल्या उर्फ प्रितेश राजू पवार (19, तिघेही रा. सांगली), दादा उर्फ पिराजी भगवान लगाडे (21, बिबवेवाडी पुणे), दिगंबर संदेश जानराव (21, सोलापूर) अशी मोक्का कोठडी सुनाविन्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात अक्षय उर्फ बबलू उर्फ बळी धनजंय सुरववसे, पुंडलिक शंकर वनारे, मनोज शंकर शिरसीकर, भक्‍तराज ज्ञानेश्‍वर धुमाळ, विकास उर्फ विकी नागनाथ मोरे, संदिप पांडुरंग आधटराव, पवन अनिल आधटराव, सोनू उर्फ ओंकार बिरा पुकळे, रईस अब्दुल बारी खान, विशाल आण्णासाहेब पवार, चिंट्या उर्फ अभिषेक आबा सुरवसे, बंडू उर्फ नितीन भारत बारंगुळे, शाहरुख अकबर शेख, णकनाथ उर्फ नाथा शिंदे, खंडू बनसोडे, सुनिल वाघ, सचिन देवमारे, बबलू रामदास शिंदे यांच्यावरही संदीप पवार यांच्या खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यबाबात सुरेखा दिलीप पवार (54, रा. नवीपेठ, पंढरपुर ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांचा 18 मार्च 2018 रोजी येथील हॉटेल श्रीराममध्ये गोळ्या घालून धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. भाजपचा गोपाळपूर जि. प. सदस्य गोपाळ अंकुशराव यानेच हा गुन्हा कट रचून घडवून आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने त्याला व त्याच्या साथीदारांना मोक्कानुसार कारावाई करून पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. हा खून कट करून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्याबाबत तपास सुरू आहे.

गुन्ह्यातील हत्यारे कशी व कोठून मिळवली. त्यापैकी दोन पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. गुन्ह्याचा कट करण्यासाठी गोपाळ अंकुशरावला अक्षय सुरवसे कोठे भेटला, अशा प्रकारे आरोपींनी संघटितरित्या कोठे कोठे गुन्हे केले आहेत, याचा तपास करायचा असल्याने विशेष सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी आरोपींच्या पोलीस कोठडची मागणी केली. त्याला बचाव पक्षाचे वकील ऍड. विजयकुमारसिंह ठोंबरे यांनी गोपाळ अकुंशराव याच्या वतीने विरोध करताना वकीलांच्या उपस्थितीत करण्याची मागणी केली. त्यावर न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून ती मागणी मान्य केली. गुन्ह्याचा तपास अकलुज सोलापूर ग्रामीण विभगाचे उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण करीत आहेत.

यापूर्वी अटक केलेल्या चौघांच्या पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेधोरे हाती लागले आहेत. त्यामध्ये एक वर्षापासून संदीप पवार व भैया पवार यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम सुरू असल्याच तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. संदीप पवार आणि अंकुशराव यांच्यात पूर्ववैमनस्य होते.

भाजपा जिल्हा परिषद सदस्य गोपाळ बाजीराव अंकुशराव याचा तपास हा त्याचे वकिल ऍड. विजयसिंह ठोंबरे याच्या समोर कारावा असा अर्ज त्याच्या वकिलांनी केला होता. त्यावर मोक्का न्यायाधिशांनी तपास अधिकाऱ्यांना आरोपीचा तपास ऍड. ठोंबरे यांच्या उपस्थितीत करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी पक्षातर्फे ऍड. विकास घोगरे यांनी काम पाहिले. तर, आरोपीतर्फे ऍड. विजयसिंह ठोंबरे व ऍड. जयपाल पाटील यांनी काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button