डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या स्विगी बॉयने एका तरुणीचा केला विनयभंग
पुणे |महाईन्यूज |प्रतिनिधी|
पुणे शहरातील स्विगी डिलिव्हरी बॉयचे संतापजनक कृत्य समोर आले आहे. ऑर्डर स्वीकारल्यानंतर डिलीव्हरी देण्यासाठी आलेल्या स्विगी बॉयने एका तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर स्विगी डिलीव्हरी बॉयचे हे संतापजनक कृत्य समोर आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. स्विगी बॉयने पाणी मागितल्यानंर पीडित तरुणी पाणी आणण्यासाठी घरात गेली तेव्हा संबंधित तरुणीसमोर तो पॅन्टचे बटण आणी चेन खोलून उभा राहिला. यानंतर त्याने घाणेरडे कृत्य केले. याबाबत पीडित तरुणीने स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरला तक्रार करुनही दखल घेतली न गेल्याने अखेर डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी विधी शाखेच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. तिने ऑनलाईन पध्दतीने स्विगी कंपनीच्या वेबसाईटवरुन खाद्य पदार्थाची ऑर्डर केली. दरम्यान डिलीव्हरी बॉय रात्री दहाच्या सुमारास ऑर्डर घेऊन आला. ऑर्डर दिल्यानंतर त्याने पिडीत तरुणीला पाणी मागितले. पिडीत तरुणी पाणी घेऊन आली असता तिला मोठा धक्का बसला. डिलिव्हरी बॉय पॅन्टचे बटण आणी चेन खोलून समोर उभा होता. यानंतर त्याने घाणेरडे कृत्य करत पिडीतेचा विनयभंग केला. हा सर्व प्रकार पाहून तरुणीला धक्का बसला. त्यानंतर घाबरेलल्या अवस्थेत तातडीने दरवाजा लावून घरात धाव घेतली. यानंतर तिने स्विगी कंपनीच्या कस्टमर केअरकडे तक्रार दाखल केली. मात्र याबाबत कंपनीने कोणत्याही प्रकारची कारवाई न करता बदनामी होईल या भितीने जाणीवपूर्वक माहिती लपविली. त्यानंतर पिडीत तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पुढील तपास डेक्कन पोलिस करीत आहेत.