‘टेट्रा ट्रक घोटाळ्याबाबत बोललो, तर विरोधकांना तोंड उघडायला जागा राहणार नाही’
पुणे – काँग्रेस सरकारने संरक्षण दलासाठी खरेदी केलेल्या टेट्रा ट्रक्स खरेदी प्रकरणात केलेल्या घोटाळ्याबाबत जर मी बोललो तर विरोधकांना तोंड उघडायला जागा राहणार नाही. त्यांना राफेल खरेदीबाबत बोलण्याचा काही अधिकार नाही, असा आरोप परराष्ट्र धोरण राज्य मंत्री व माजी लष्करप्रमुख विजयकुमार सिंह यांनी केला. ते पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘भारत के मन की बात, मोदी के साथ’ या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी भाजप चे शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते.
सध्या भारतीय संरक्षण दलात 36 राफेल विमानांची खरेदी केल्याप्रकारणाचा व त्यामध्ये घोटाळा झाल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला आहे. याबाबत सिंग म्हणाले, संरक्षण मंत्रालयातील खरेदी प्रक्रिया ही खूप विस्तृत असते. राफेल विमानांची क्षमता पाहता ते खरेदी करण्याची भारताला गरज आहे. या खरेदीला उशीर लागला करण ही मोठी प्रक्रिया आहे. उद्या भारतावर कोणी आक्रमण केले तर त्याला उत्तर देण्यासाठी ते हवे आहेत. परंतु विरोधकांकडून याबाबत केले जाणारे राजकारण निंदनीय आहे, एवढे बोलून त्यांनी याविषयी जास्त बोलण्यास नकार दिला.