टायर पंक्चर झालेल्या एसटीला ट्रकची धडक, चालक-वाहक ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/ST-accident.jpg)
मुंबई- बेंगळूरु महामार्गावर टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एसटीला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत एसटी चालक आणि वाहकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, पाच प्रवासीही जखमी झालेत. मुंबई- बेंगळूर महामार्गावर पाषाण जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास मुंबईवरून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे चालक मोहन उत्तमराव बांदल आणि वाहक शंकर चंद्रकांत चव्हाण यांनी एसटी रस्त्याच्या बाजूला थांबवली व ते खाली उतरून पाहणी करत होते. त्यावेळी काही प्रवासीही खाली उतरले होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने एसटीला जोरदार धडक दिली. यामध्ये बांदल आणि चव्हाण यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, बांदल यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तसेच, चव्हाण यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी अभिजित मोहन बांदल (वय 25) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रकचालक राजीव सुंदरम गांधी (वय 36, रा. उलुंडरपेट, जि. विल्लपुरम, तामिळनाडू) याला अटक करण्यात आली आहे.