जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमध्ये आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/ftii-jnu-attack.jpg)
पुणे | महाईन्यूज
जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचे प्रतिसाद पुण्यातील शिक्षण संस्थांमध्ये उमटले असून, एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी रात्री उशिरा संस्थेसमोर एकत्र येत हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात घोषणाबाजी करत जेएनयूमधील विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे परिसर चांगलाच दणाणून गेला होता.
एफटीआयआयच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येत विद्यार्थ्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आहेत. त्याचप्रमाणे हातात मशाली पेटवून अभाविपचा निषेध केला आहे. विद्यार्थी आंदोलन करत असल्याचे समजताच काही पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले आहे. शहरात इतर ठिकाणी गेलेले विद्यार्थी सुध्दा हळूहळू आंदोलन स्थळी जमत असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात एनएसयूआयतर्फे निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या निर्धार सभेत विविध विद्यार्थी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एनएसयूआय संघटनेचे अध्यक्ष सतीश पवार यांनी केलेले आहे.