छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड- किल्ल्यांचे पर्यटनाच्या दृष्टीने संवर्धन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/18.jpg)
पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी|
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सहा किल्ल्यांच्या ठिकाणी विकासकामांचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संवर्धन करताना पावित्र्य राखत पर्यटनवाढीसाठी नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील शिवनेरी, सिंहगड, जीवधन-नाणेघाट, राजमाची; तर कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि रांगणा-भुदरगड या किल्ल्यांची निवड केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, त्यासाठी सुमारे सव्वाआठ कोटी रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे. सिंहगड किल्ल्यावर शौर्याचा इतिहास पर्यटकांना माहीत व्हावा, यासाठी ‘लाइट अँड साउंड शो’ सुरू करण्यात येणार आहे, त्यावर सात कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव आहे.
किल्ले सिंहगड आणि परिसराचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, त्यासाठी ५१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटकांसाठी निवासाची व्यवस्था, वाहनतळ, तंबू निवास आणि ‘गाइड ट्रेनिंग’ अशा सुविधा, तसेच जीवधन-नाणेघाट किल्ल्याच्या परिसरातही बेस कॅम्प, तंबूनिवास, पदपथ, रेलिंग उभारण्याचा विचार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी पर्यटक निवास, वाहनतळ सुविधा निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच, रांगणा-भुदरगड किल्ल्यांच्या पायथ्याशी निवास व्यवस्था, तंबू निवास, पदपथ आणि रेलिंगची सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.