चुकीच्या माणसामूळे भाजपचे नेते बदनाम – प्रशांत शितोळे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/laxman-jagtap-shitole.jpg)
करदात्यांचा पैसा वाचविल्याने भाजपचे अभिनंदन
पिंपरी – घरोघरचा कचरा उचलून मोशीतील कचरा डेपोत वाहून नेण्याच्या कामात करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी करण्यात येणार होती. त्यामुळे ती निविदा रद्द करण्याची मागणी आयुक्तांसह मुख्यमंत्री व पंतप्रधानाकडे राष्ट्रवादी व शिवसेनेने केली होती. ती निविदा रद्द करुन करदात्या नागरिकांचा पैसा वाचविल्याने भाजपचे आम्ही अभिनंदन करतो, परंतू, भाजपमधील चुकीच्या माणसांच्या हाती कारभार दिल्याने शहरातील नेतेमंडळी बदनाम होवू लागली आहे. पदाधिका-यांच्या चुकीमुळे आमदारावर अशा प्रकारे पांग फेडण्याची वेळ आली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. यावेळी नगरसेवक नाना काटे उपस्थित होते.
शितोळे म्हणाले की, आमदार लक्ष्मण जगताप यांचा मी पुर्वी कट्टर समर्थक होतो. मी स्थायी समिती सभापती असताना त्यावेळी चुकीचा कारभार न केल्यामुळे आमच्या वरिष्ठ नेत्यांना महापालिकेत येवून पांघरुन घालण्याची वेळ कधी आली नव्हती, कारण अजित पवारांची तेवढी भिती असायची, परंतू, भाजपमधील चुकीच्या कारभारामुळे शहराध्यक्ष लक्ष्मण जगतापांना कचरा निविदा प्रक्रियेत मिंदे नसल्याचे सांगावे लागत आहे, हे मोठे दुदैवी आहे.
महापालिका हद्दीतील घरोघरचा कचरा उचलून मोशी कचरा डेपोत वाहून नेण्यासाठी शहराची दोन भागात विभागणी करून 450 कोटींची निविदा काढली. हे काम बीव्हीजी इंडिया आणि ए. जी. एन्व्हायरो प्रा. लि. या दोन्ही कंपन्यांना आठ वर्षाच्या मुदतीवर देण्यात आली. मात्र, या निर्णयात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी- शिवसेनेने केला होता. दोन्ही ठेकेदारांना परस्परपुरक दर दिल्यामुळे यात रिंग झाल्याचा आरोपही केला होता. तसेच, आठ वर्ष कामकाजाची मुदत असल्याने दोन्ही ठेकेदारांवर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही, असेही नमूद केले होते, असे शितोळे यांनी सांगितले.