कोरोना रोखण्यासाठी पुण्यात संचार बंदी लागू; आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/8-12.jpg)
पुणे |महाईन्यूज|
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यात संचारबंदी लागू झाली आहे. आज (ता.१६) मध्यरात्रीपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालल्याने निर्णय घेण्यात आला आहे.
‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उद्योजकांनी औद्योगिक घटकांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’ ची मुभा द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी केले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत आज डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत कौन्सिल हॉल येथे बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल व संजीव देशमुख, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले की, कोरोनासाठी ठोस औषध तयार झाले नसून रुग्णाच्या लक्षणांनुसार त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जगभरातील बहुतांश देश या विषाणूने बाधित झाले आहेत. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी, असे सांगून डॉ. म्हैसेकर म्हणाले, उद्योग क्षेत्रात कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करावी.असेही म्हटलेले आहे.