कोथरूडमध्ये विरोधक एक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/kothrud-pune.jpg)
- भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटलांविरोधात मनसेचे किशोर शिंदे
भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांना कोथरूड या भाजपच्या बालेकिल्ल्यातच पराभूत करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. आघाडीकडून या मतदार संघात उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे हेच सर्वपक्षीयांचे मिळून उमेदवार असून कोथरूडमधील लढत भाजप-मनसे अशी होणार आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपात कोथरूड मतदार संघ मित्रपक्षाला सोडल्याची घोषणा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी केली होती. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा मित्रपक्ष कोण, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आणि त्यांना रोखण्यासाठी विरोधकांनी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली.