कॅशलेसच्या प्रयत्नांना नागरिकांचाच हरताळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/cashless-.jpg)
- अपेक्षित प्रतिसाद नाही : ऑनलाइन पैसे भरण्याकडे पाठ
पुणे – दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये नागरिकांना पारदर्शी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दस्त हाताळणी शुल्क ऑनलाइन (कार्ड पेमेंट) स्वीकारण्याचा निर्णय नोंदणी विभागाने घेतला. ही सुविधा उपलब्ध होऊन 30 दिवस झाले, तरी त्यास नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले आहे.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग आहे. याविभागाकडून विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन पद्धतीने देण्यावर भर दिला जातो. याचाच एक भाग म्हणून दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त हाताळणी शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्यात दरवर्षी सुमारे 40 कोटी रुपयांचा महसूल दस्त हाताळणी शुल्क या शीर्षकाखाली जमा होतो. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमांतर्गत महसूली व्यवहार कॅशलेस करण्याचे महत्त्वाकांक्षी योजना देशभर राबविल्या जात आहेत. राज्यात महसूल विभागांतर्गत असणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने मुद्रांक शुल्क ऑनलाइन पध्दतीने भरण्याची सुविधा या पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. दस्त हाताळणी शुल्क प्रति पान 20 रुपये आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना रोख रक्कम बाळगावी लागते. या करिता नोंदणी विभागाने दस्त हाताळणी शुल्क ही सेवा नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. पण, त्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे.