breaking-newsपुणे

कुलू-मनाली अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची 15 तासांनंतर सुटका

पुणे –  कुलू-मनालीहून चंडीगडकडे जाताना 66 किलोमीटर अंतरावर डोंगराळ भागातील रस्त्यावर शुक्रवारी रात्री दरडी कोसळल्याने पुण्या-मुंबईच्या बारा पर्यटकांसह शेकडो नागरिक रस्त्यातच अडकून पडले. कोसळणाऱ्या दरडी, दाट धुके आणि पाऊस यामुळे कुठलीही मदत मिळण्याची चिन्हे नव्हती. अशा वातावरणात तब्बल 14 ते 15 तास पर्यटकांनी बसमध्ये बसून काढली. अखेर शनिवारी (ता. 25) दुपारी बारा वाजता दरडी काढल्या आणि पर्यटकांचा मार्ग खुला झाला; पण तोपर्यंत विमानाची वेळ निघून गेली.

पिंपरी-चिंचवड व मुंबई येथील बारा मित्र लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेले होते. परतताना ते कुलू-मनाली येथून शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता चंडीगड विमानतळावर पोचण्यासाठी निघाले. बस मनालीपासून 66 किलोमीटर अंतरावरील ओट बजौरा या गावाजवळ पोचली. एकीकडे नदी, तर दुसरीकडे डोंगर असलेल्या घाट रस्त्यावरून बस जात होती. त्या वेळी समोर वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या. बसपासून 500 मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात दरडी कोसळत होत्या.

पर्यटकांना शनिवारी दुपारी बारा वाजता चंडीगड येथून पुणे व मुंबईसाठी विमान होते. मात्र, दरडी कोसळल्याने ते तेथेच अडकून पडले. जवळच असलेल्या एका ढाब्यावर जेवण घेऊन ते बसमध्येच झोपले. शासकीय यंत्रणेने सकाळी दरड काढण्यास सुरवात केली. दुपारी बारापर्यंत ते काम झाले, त्यानंतर मनालीकडील वाहने चंडीगडच्या दिशेने सोडण्यास सुरवात झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button