‘कनेक्टींग’ संस्थेतर्फे आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/connecting-ngo-672x420.jpg)
पुणे – तीव्र निराशा, तणावग्रस्तता, कर्जबाजारीपणा, व्यसन, नातेसंबंधातील ताण आदी कारणामुळे आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या आणि खचलेल्या व्यक्तींना केवळ हेल्पलाईनच्या माध्यमातून परावृत्त करण्याचे काम “कनेक्टींग’ या संस्थेतर्फे सुरू आहे, अशी माहिती संस्थेचे वरिष्ठ समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी दिली.
मानसिक आरोग्य आणि आत्महत्या यांचा निकट संबंध आहे. हे लक्षात घेऊन संस्थेने अनेक व्यक्तींना उभारी दिली आहे. आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तसेच जवळच्या व्यक्तीला आत्महत्येने गमावलेल्या लोकांना मानसिक आधार देणे व निराशेतून बाहेर पडण्यास मदत करणे, हे काम “कनेक्टींग’ संस्था करीत आहे. शाळकरी वयापासून ते प्रौढ वयाच्या व्यक्तीही संस्थेचे सहकार्य घेत आहे, असे या प्रकल्पाचे स्वरूप आहे. संस्थेचे 2 हेल्पलाईन नंबर आहेत. 1800-843 (टोल फ्री) आणि 9922001122 या क्रमांकांवर देशभरातून कॉल्स येतात. त्यांना श्राव्य माध्यमातून विनामूल्य सेवा दिली जात आहे. आतापर्यंत 23 हजारांहून अधिक कॉल्स संस्थेने स्वीकारले आहेत. समुपदेशन करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न केलेले व जवळच्या व्यक्तीला आत्महत्येमुळे गमावलेल्या लोकांना आधार देण्याचे कार्य संस्था करीत आहे. त्यासाठी ससून रुग्णालयात हा प्रकल्प कार्यरत आहे. त्याचबरोबर पियर एज्युकेटर्स प्रोग्रॅम, जनजागृती प्रकल्प आदींच्या माध्यमातून संस्था उत्तम कार्य करीत आहे. संस्थेचे स्वयंसेवक विरेन राजपूत उपस्थित होते.