उद्ध्वस्त संसार उभारण्यास जिद्दीने सुरुवात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Untitled-3-1.jpg)
खडकवासला धरणाचा मुठा उजवा कालवा फुटल्यामुळे उघडय़ावर आलेले संसार सावरण्याची धडपड बाधित कुटुंबीयांकडून सुरू झाल्याचे चित्र शुक्रवारी दांडेकर पूल, जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात दिसून आले. जलसंकटाच्या कटू आठवणी बाजूला करीत जलप्रवाहात अस्ताव्यस्त झालेले गृहोपयोगी साहित्य जमा करण्यात आबालवृद्धांपासून चिमुकल्यापर्यंतची लढाई सुरु झाली. संकटाचा सामना करण्याच्या विश्वासातून धैर्य आणि सहनशीलता दाखवित कोणी घर स्वच्छता करीत होते, तर कोणी वस्तूंची आवराआवर करीत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून आले.
खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्याची भिंत कोसळून कालवा फुटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या जलसंकटात पर्वती,जनता वसाहत, दत्तवाडी आणि दांडेकर पूल परिसरातील सातशेहून अधिक घरांना त्याचा फटका बसला, तर काही घरे जमीनदोस्त झाली. शेकडो कुटुंबीयांच्या गृहोपयोगी वस्तूही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या, त्यामुळे अनेक संसारही क्षणार्धात उघडय़ावर आले.
कालवा फुटीमुळे गुरुवारचा संपूर्ण दिवस पाण्यात आणि रात्र महापालिकेच्या शाळांत तसेच नातेवाइकांकडे घालविल्यानंतर मात्र जलसंकटाच्या कटू आठवणी पुसत पुन्हा नव्याने उभारी घेण्याची जिद्द कुटुंबीयांनी दाखविली.
कालवा फुटीच्या घटनेचे पडसाद या भागात शुक्रवारीही दिसून आले. या परिसरातील सामान्य कष्टकरी वर्गाने मात्र जिद्दीने कामाला सुरुवात केली. नुकसानभरपाईची चर्चा सुरु असतानाच एकमेकांना आधार आणि विश्वास देत संसार उभारण्याची धडपड सकाळपासूनच सुरु झाली. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेले साहित्य काही जण शोधत होते. तर काही नागरिकांची घरात शिरलेले पाणी, गाळ काढण्याची खटपट सुरु होती. यात कुटुंबप्रमुखांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांपासून चिमुकल्यांचे हातही तितक्याच हिरिरीने राबत होते. गृहोपयोगी वस्तूंची जमावाजमव पुन्हा सुरु झाली.
संसार उभारण्याच्या भावनेतून कोणी घर स्वच्छ करतानाही दिसून आले, तर घरात भिजलेले साहित्य कोणी वाळविण्यासाठी मोकळ्या जागेत ठेवल्याचेही आढळून आले. अस्ताव्यस्त पडलेल्या साहित्यामध्ये आपल्या काही चीज वस्तू आहेत का, याचाही शोध घेतला जात होता. ही सर्व खटपट सुरु होती ती एकमेकांना विश्वास आणि पुन्हा उभे राहण्याचे धैर्य देत.