आग्रा ते पुणे पदभ्रमणातून शिवछत्रपतींना मानवंदना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/09/agra-to-pune.jpg)
पुणे: इतिहासात त्यांचे पूर्वज पिलाजी गोळे पायदळप्रमुख म्हणून गौरविले गेले. आज वर्तमानात वकिली व्यावसाय आणि शेतकरी म्हणून नावलौकिक मिळवतानाच आपल्या पूर्वजांची कर्तबगारीचे स्मरण करून ३४ दिवसांत त्यांनी आग्रा ते राजगड ही पदभ्रमण मोहीम पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका या इतिहासाने सुवर्णक्षरात नोंदलेल्या घटनेला यंदा ३५१ वर्षे पूर्ण झाली. महाराजांना मानवंदना म्हणून पुण्याच्या अॅड. मारुती गोळे यांनी ही मोहीम शनिवारी पुण्यात दाखल होऊन फत्ते केली. सोमवारी (१८ सप्टेंबर) राजगडावरील पद्मावती मातेच्या मंदिरात यथासांग पूजा करून त्यांची ही प्रेरणादायी मोहीम सुफळ संपूर्ण होणार आहे.
गेले वर्षभर पुणे परिसरात आठशेहून अधिक किलोमीटर पायी चालून त्यांनी आग्रा ते राजगड या मोहिमेची पूर्वतयारी केली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेले आशीर्वाद तसेच वडील पै. बबन गोळे, पत्नी स्वाती गोळे तसेच मोठे बंधू, मुलगा मेघराज तसेच कन्या मैत्रेयी आणि मित्रमंडळींच्या भक्कम पाठिंब्यातून या मोहिमेला बळ मिळाल्याचे गोळे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. त्यांच्या या मोहिमेत अनिल ठेंबेकर (५०) आणि मनोज शेळके (५३) यांनी साथसंगत करून मित्राचे मनौधैर्य उंचावण्याचे काम केले. आग्रा ते राजगड या शिवछत्रपतींच्या प्रवासाला १७ ऑगस्ट रोजी ३५१ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवसाचे औचित्य साधून गोळे यांनी सुमारे एक हजार ४५० किलोमीटर अंतराच्या या मोहिमेची सुरुवात केली. त्यासाठी राजगडावरची माती त्यांनी सोबत नेली होती.
या मोहिमेबाबत माहिती देताना गोळे म्हणाले, ‘मी मूळचा पिरंगुट (ता. मुळशी, जि. पुणे) या गावचा रहिवासी. गडकोटांची ओढ निर्माण झाल्यावर माझी भेट मुंबईचे इतिहास अभ्यासक प्रा. डॉ. श्रीदत्त राऊत यांच्याशी झाली. ‘तुमच्या पूर्वजांची परंपरा पायदळाची आहे त्यामुळे तुम्हीही अशी कामगिरी करा,’ असे त्यांनी म्हटले आणि मी ते मनावर घेतले.’ ‘आजच्या पिढीला पुन्हा इतिहासाकडे नेण्याची आणि त्याचे स्मरण देण्याची आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ज्यांच्यामुळे शिल्लक आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी ही मोहिम आयोजित केली होती,’ असेही गोळे यांनी सांगितले.
ध्येय दक्षिण दुर्गमोहिमेचे
अॅड. मारुती गोळे यांनी महाराष्ट्रातल्या सर्वच गडांची भ्रमंती पूर्ण केली आहे. त्यांनी आजवर ५१३ गडकोटांवर अभ्यास मोहिमा केल्या आहेत. या मोहिमा करताना गडांचे परिघही त्यांनी चाळून काढले आहेत. महाराष्ट्रासह त्यांनी परदेशातल्या गडांनाही भेटी दिल्या आहेत. पुढच्या टप्प्यात दक्षिण भारतातल्या गडकोटांना भेट देण्याचे नियोजन करणार असून, येत्या दोन वर्षांत दक्षिणेतले सगळे दुर्ग पाहण्याच मानस असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.