अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार; हडपसरमधील घटना
![Drinking at the Chinese Center in Bhosari; Three have been charged](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/crime-13-1.jpg)
पुणे |महाईन्यूज|
पालकांशी वाद झाल्याने घर सोडून मित्राला भेटायला निघालेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हडपसरपोलिस ठाण्यामध्ये चार जणांविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील दोघा आरोपींना गुरूवारी रात्री पकडण्यात आले आहे. मात्र त्याचे दोन मित्र फरार आहेत. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. तिला कोणीतरी फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरू होता. दरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर बलात्कार केला असल्याचे सांगितले. तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिस ठाण्याच्या तपास पथकांनी आरोपींचा शोध सुरु केला. गुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपींना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले.
संबंधित मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती घरातून रुसून बाहेर पडली आणि तिच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात यातील एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला मित्राकडे सोडतो असे सांगितले. यानंतर तिला एके ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. यानंतर संबंधित तरुणाने त्याच्या दुस-या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. याप्रकारे इतर आणखी दोघा मित्रांनी येऊन तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. …..