breaking-newsपुणे

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

  • आजपासून प्रवेश अर्जाचा भाग २ भरता येणार

पुणे : राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या अकरावीच्या प्रवेशासाठीचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग दोन बुधवारपासून (१९ जून) भरता येणार असून, शून्य फेरी, नियमित प्रवेशाच्या तीन फे ऱ्या आणि एक विशेष फेरी अशा एकूण पाच फे ऱ्यांमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार असून किमान ७० टक्के प्रवेश झाल्यावर महाविद्यालयांना अकरावीचे वर्ग सुरू करता येतील.

केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडून ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांना १९ ते २३ जून दरम्यान द्विलक्ष्यी (बायफोकल) विषयांचे पसंतीक्रम भरावे लागणार आहेत. तसेच कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक शाखांचे (एमसीव्हीसी) अर्ज भरता येतील. १९ ते २९ जून दरम्यान द्विलक्ष्यी अभ्यासक्रम वगळता अन्य सर्व शाखांचे भाग १ आणि भाग २ भरता येतील. २५ जूनला द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. २६ आणि २७ जूनला सकाळी अकरा ते पाच या वेळेत द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. १ जुलैला सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. २ आणि ३ जुलैला प्रवेश अर्जातील त्रुटी आणि हरकतींवर आक्षेप नोंदवता येतील.

नियमित प्रवेशांना ६ जुलैपासून सुरुवात होणार असून पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना ८ ते १० जुलै दरम्यान प्रवेश देण्यात येतील. १० जुलैला रिक्त जागांचा तपशील आणि पहिल्या फेरीचे कटऑफ जाहीर केले जातील. ११ आणि १२ जूनला प्रवेश अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरता येईल. प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी १५ जुलैला जाहीर होईल. १६ ते १८ जुलै दरम्यान दुसऱ्या यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. १८ जुलैला दुसऱ्या यादीचा कटऑफ आणि तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठीच्या उपलब्ध जागा जाहीर करण्यात येतील. २४ आणि २६ जुलैला तिसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जातील. २६ जुलैला तिसऱ्या यादीतील रिक्त जागा आणि कटऑफ जाहीर करण्यात येणार आहेत. तर २७ आणि २९ जुलैला अर्जाचा भाग १ आणि भाग २ भरता येईल. ३१ जुलैला विशेष फेरीची गुणवत्ता यादी जाहीर होईल. १ आणि २ ऑगस्ट दरम्यान विशेष फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील. ३ ऑगस्टला उपलब्ध रिक्त जागा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

प्रवेशासाठीच्या राखीव जागा

इनहाउस, अल्पसंख्याक, व्यवस्थापन, तांत्रिक या कोटय़ातील प्रवेश महाविद्यालय स्तरावर होतील. महाविद्यालयाच्या शाखा आणि माध्यमनिहाय एकूण प्रवेश क्षमतेच्या इनहाउस १० टक्के, अल्पसंख्याक  ५० टक्के, तर व्यवस्थापन ५ टक्के जागा असतील. शून्य फेरीत राखीव जागांअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

नामांकित महाविद्यालयातील १० टक्के जागा वाढणार

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचा निकाल घटल्याने सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांच्या अंतर्गत गुणांबाबतच्या वादावर तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीत ८५ टक्क्य़ांहून अधिक कटऑफ असलेल्या नामांकित महाविद्यालयातील जागा १० टक्क्य़ांनी वाढणार आहेत. त्याचा फायदा राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना होणार असून नामांकित महाविद्यालयांमध्ये त्यांच्यासाठीही जागा उपलब्ध होऊ शकतील.

पसंतीक्रम काळजीपूर्वक भरा

प्रवेश अर्जाचा भाग २ भरताना किमान एक आणि कमाल दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम विद्यार्थ्यांना देता येतील. मात्र, पसंतीक्रम भरताना विद्यार्थ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्याच जागेवर प्रवेश घेणे बंधनकारक असून प्रवेश न घेतल्यास त्या विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत अन्य फेरीत सहभाग दिला जाणार नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button