breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“योगीजी, या निरागस मुलाच्या किंकाळ्या तुम्हाला झोपू कशा देतायत?”, उत्तर प्रदेशमधील ‘त्या’ व्हिडीओवरून खळबळ!

मुंबई |

गुरुवारी संसदेमध्ये केद्र सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या आकडेवारीचा दाखला देत उत्तर प्रदेशात या वर्षी सर्वाधिक मानवाधिकार उल्लंघनाची प्रकरणं दाखल असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून उत्तर प्रदेश पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं असून समाजातील सर्वच स्तरातून उत्तर प्रदेश पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला जात आहे. या कृत्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

  • काय आहे प्रकरण?

हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या कानपूरमधला आहे. कानपूरच्या देहात जिल्हा रुगणालयातील कर्मचारी आसपासची अस्वच्छता, गाड्यांचे कर्णकर्कश्य आवाज याला विरोध करत होते. त्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. गुरुवारी हा वाद विकोपाला जाऊन या कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी हॉस्पिटलच्या आवारात होत असलेल्या बेकायदा बांधकामाविरोधात ओपीडी बंद करून गेटवरच धरणे आंदोलन सुरू केलं.

दरम्यान, पोलिसांनी दावा केल्यानुसार आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन वाद सुरू झाला. ओपीडी पुन्हा सुरू करण्यासाठी पोलीस आंदोलकांना भाग पाडण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान रजनीश शुक्ला नावाच्या एका आंदोलकानं रागाच्या भरात पोलीस निरीक्षक व्ही. के. मिश्रा यांचा अंगठा चावला. यानंतर पोलिसांनीही आंदोलकांवर लाठीमार सुरू केला.

  • मूल रडत होतं, पण तरी…

याचदरम्यान, एका व्यक्तीला लाठीने मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पोलिसांच्या हातात काठी असून ते या व्यक्तीला मारत आहेत. या व्यक्तीच्या हातात एक मूल असून ते रडत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही व्यक्ती हातातील मुलाला लागेल, असं वारंवार विनवत असूनही पोलीस लाठीने मारहाण करतच असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, या प्रकारावरून काँग्रेसनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. “योगीजी, या निरागस मुलाच्या किंकाळ्या तुम्हाला झोपू कशा देतायत?” असा सवाल काँग्रेसच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केला आहे.

या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button