शिवसेनेत प्रवेश केलेल्या महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या नाहीत- प्रा.कविता आल्हाट
जबाबदारी, पदे दिली नसताना कार्यकर्त्या कशा होतील; राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट यांचा सवाल
![In Shiv Sena, admitted, there are no women, nationalists, activists,- Prof. Kavita Alhat,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/KAVITA-ALHAAT-780x470.png)
पिंपरी, 19 मार्च :
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारणीमधील अडीचशे सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असे सांगितले जात असून हे धादांत खोटे आहे.या महिला पदाधिकाऱ्यांना आताच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकारिणीने पदे दिलेली नाहीत. किंवा संघटनेची कोणतीही जबाबदारी दिली नसताना त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या कशा होऊ शकतात असा सवाल पिंपरी चिंचवड शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांनी केला आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांनी निवेदन दिले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत खुशबु प्रशांत दिघे, प्रशांत दिघे यांच्यासह अडीचशे जणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्याबाबतचे वृत्त काही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले. मात्र ज्या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा कोणत्याही अर्थी राष्ट्रवादी महिला काँग्रेस संघटनेशी
संबंध नाही.
शिवसेनेकडून महिला पदाधिकाऱ्यांची जी नावे सांगितली जात आहेत. त्या महिला कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसने कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिलेली नाही.किंवा महिला शहराध्यक्ष या नात्याने मी त्यांना कोणतीही पदे दिली नसल्याचे आल्हाट यांनी म्हटले आहे.
निव्वळ खोडसाळपणा
काही जबाबदार राजकीय मंडळींकडून त्यांच्या पक्षांमध्ये जोरदार “इनकमिंग सुरू असल्याचा भ्रम निर्माण करण्याचा खोडसाळपणा सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, विविध प्रसार तंत्राच्या माध्यमातून त्यांच्या पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची रीघ लागली आहे असे दाखविण्याचा जाणीवपूर्वक बनाव रचला जात आहे. मात्र कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर आणि खोडसाळपणावर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रा.कविता आल्हाट यांनी केले आहे.