मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

मुंबई : काही दिवसांपूर्वी भाजपने शिंदे गटाला धक्का देत शिंदे गटाचे तीन नगरसेवक फोडले होते. यानंतर मनसेच्या बाबतीत असेच होते की काय ? याचे संकेत मिळत आहेत.मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर भाजपमध्ये? रवींद्र चव्हाण यांच्या सूचक वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कल्याण–डोंबिवलीच्या राजकारणात मोठे संकेत देणारे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांच्या दिशेने केलेल्या इशाऱ्यांनी नवीन चर्चांना उधाण आले आहे.
डोंबिवलीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना विश्वास देत स्पष्ट आवाहन केले. रवींद्र चव्हाण म्हणाले, “प्रत्येक निवडणुकीत तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास अमूल्य आहे. या वेळेला फक्त एवढीच विनंती कमळ चिन्हावर उभा राहणाऱ्या उमेदवाराला मतदान करा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील.”
शिवाय यावेळी त्यांनी नगरसेवकांच्या कार्यक्षमतेवरही भाष्य केले. ते म्हणाले, विकास निधी देणे माझे काम आहे, परंतु प्रत्यक्ष काम नगरसेवकांनी करायला हवे. अडचणी काय होत्या हे सांगायला तुम्ही दूधखुळे नाही, असे म्हणत त्यांनी काही माजी नगरसेवकांकडे सूचकपणे बोट दाखवले.विशेष म्हणजे, भाजप सोडून शिवसेनेत गेलेल्या विकास म्हात्रे यांच्यावरही त्यांनी नाव न करता टोला लगावला.
कार्यक्रमात मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर देखील उपस्थित होते. वंदे मातरमच्या घोषणा देताना रवींद्र चव्हाण यांनी भोईर यांच्या दिशेने पाहत म्हटले, “प्रकाश भोईर देखील उद्या वंदे मातरमची घोषणा देतील.” या एका वाक्याने उपस्थितांमध्ये हशा पिकला, तर राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली.
यावर भाष्य करताना प्रकाश भोईर म्हणाले की, “कार्यकर्त्यांनी जो निर्णय घेतला तो मी मान्य केला आहे, यापुढेही जो निर्णय कार्यकर्ते घेतील तो मला मान्य असेल” असे सूचक विधान केले. रवींद्र चव्हाण यांच्या या शैलीदार इशाऱ्यानंतर भोईर यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता जोर धरू लागली आहे.डोंबिवलीतही मनसेतील मोठा नेता कमळाकडे झुकतोय का? असा प्रश्न स्थानिक राजकारणात चर्चेत आहे.




