२०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
![Who is the face of Chief Ministership in 2024 Devendra Fadnavis said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/devendra-fadnavis-and-eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार अल्पकाळ टिकेल असे दावे विरोधी पक्षाकडून वारंवार केले जात आहेत. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार असल्याचं भाजपने जाहीर केलं आहे. दरम्यान, २०२४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो. त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात. जर त्या वेळी आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल, तर पक्ष तो निर्णय घेईल. पण मला वाटत नाही की दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे.
हेही वाचा – ‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाहीये. पाच वर्षं मुख्यमंत्री असताना मी खूप काम केलंय. मी ज्या जागी आहे, तिथे खूश आहे. माझ्यासाठी तर पक्षाला पुन्हा निवडून आणणं याला प्राधान्य आहे. नेता कोण कधी बनेल यावर पक्ष निर्णय घेईल. मला मोदींनी मुख्यमंत्री केलं, तेव्हा इतरही अनेक लोक होते. पण मोदींना वाटलं की मी चांगलं काम करू शकेन म्हणून त्यांनी मला मुख्यमंत्री केलं, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.