breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

बारामतीबाबत काय म्हणाले? निकालानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, आता आम्ही…

बारामती : लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी आता संपली. मतनाचे निकाल हाती आले असून मतदारांचा कौलही स्पष्ट झालाय. भाजपाप्रणित एनडीचे सरकार देशात पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. पण भाजपला बहुमत मिळालेले नसल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. महाराष्ट्रात तर महायुतीला अवघे 17 जागा मिळाल्या असून ज्या शिंदे आणि अजित पवार यांना भाजपने हाताशी धरले त्यांनाही विशेष यश मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा तर अवघा एक खासदार निवडून आला आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामतीच्या लढतीत मात्र अजित पवार गटाचा दारूण पराभव झाला. बारामतीमध्ये पवार वि. पवार अशा रंगलेल्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना पराभत करत विजयाची हॅटट्रिक केली. शरद पवार वि अजित पवार असा हा खरा सामना होता आणि दोघांसाठीही ही लढाई प्रतिष्ठेची होती.

मात्र बाप हा बापच असतो हे या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केलं आणि बारामतीच्या जनतेने शरद पवार , सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात मत टाकलं. बारामती आणि राज्यातील एकूण निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. X या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांनी एक ट्विट केलं आहे. एनडीएला मिळालेल्या बहुमताबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र महाराष्ट्र आणि बारामतीच्या अपयशाचा उल्लेख करताना त्यांनी कुठलंही अपयश अंतिम नसतं असं नमूद करत अपयशानं खचून जाऊ नका असा सल्ला सर्व कार्यकर्त्यांना दिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील, असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा – ‘मुंबईत ठाकरे गटाचा भगवा नाही तर ‘हिरवा’ विजय’; मनसे नेत्याचा खोचक टोला

अजित पवार यांचं ट्विट जसच्या तसं त्यांच्याच शब्दात..

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीला मतदान केलेल्या समस्त मतदार बंधु-भगिनींचे सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’नं बहुमताचा टप्पा गाठला, त्याबद्दल प्रधानमंत्री महोदयांचं आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. ‘एनडीए’च्या विजयासाठी गेले काही महिने सातत्यानं परिश्रम घेतलेले सर्व नेते, कार्यकर्ते, हितचिंतक, मतदार बंधू-भगिनी सर्वांना धन्यवाद देतो.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीच्या नेत्यांकडून निकालाचं विश्लेषण केलं जाईल. त्यांच्या निष्कर्षाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्यानं निवडून आले आहेत. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अरुणाचल विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आमदार निवडून आले आहेत. पक्षासाठी हे अभिमानास्पद यश आहे. पक्षाच्या या विजयी उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन करतो. देशात लवकरंच सलग तिसऱ्यांदा स्थापन होणारं ‘एनडीए’चं सरकार जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता करण्यात, देशाला महाशक्ती बनवण्यात यशस्वी होईल, याची खात्री आहे. प्रधानमंत्री मा.श्री. नरेंद्र मोदी साहेब आणि ‘एनडीए’च्या सर्व विजयी उमेदवारांचं पुन:श्च अभिनंदन!

पुनश्च धन्यवाद!

दरम्यान बारामती निवडणुकीतील पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनीही पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनीही एक ट्विट केलं आहे. ‘ लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जनतेने दिलेला कौल मी नम्रपणे स्वीकारते. हाती आलेले निकाल अनपेक्षित असले तरीही या निकालातून आम्ही आत्मपरीक्षण करु. नव्याने पुनर्बांधणी करु. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास दर्शवून मला मतदान केलं, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानते. सर्व कार्यकर्ते व जनता यांच्या सहकार्याबद्दलही धन्यवाद देते. जनसेवेचा माझा प्रवास इथेच संपत नाही. मी जनसेवेस कायमच तत्पर आहे आणि असेन. पुनश्च आभार!’ अशी पोस्ट सुनेत्रा अजित पवार यांनी केली .

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button