..तर वेगळा विचार करावा लागेल; विलास लांडेंचा अजितदादांना इशारा
![Vilas Lande said that if you want to nominate an imported candidate, you have to think differently](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Vilas-Lande-780x470.jpg)
पिंपरी | माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षाने आदेश दिल्यास राष्ट्रवादी पक्षाकडून शिरूर लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. यामुळेच आता विलास लांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आयात उमेदवाराला शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देणारा असाल तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असं सूचक विधान भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी केलं आहे.
विलास लांडे म्हणाले की, गेल्या पंधरा वर्षांपासून मी इच्छुक आहे. २००९ पासून ते आजतागायत शिरूर लोकसभेसाठी इच्छुक आहे. काही गोष्टी नेत्यांच्या निर्णयानंतर बदलाव्या लागतात. तस वागावं लागतं. आगामी २०२४ शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. यात राजकीय परिस्थिती उलटसुलट झाली आहे. २०१९ ला सुद्धा या मतदारसंघातून निवडणुकीची तयारी केली. चार महिने मतदारसंघात फिरलो. वातावरण निर्मिती केली.
हेही वाचा – ..तर आम्ही भाजपा-आरएसएसबरोबर जाऊ; प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
ऐनवेळी राष्ट्रवादी पक्षात अमोल कोल्हे यांची एन्ट्री झाली. त्यांना उमेदवारी देण्यात आली. तरी अजित पवारांच्या शब्दामुळे त्यांचे प्रामाणिकपणे मी काम केले. एवढं सगळं केल्यानंतर आयात उमेदवाराला उमेदवारी देणार असतील तर काही गोष्टींचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा विलास लांडे यांनी अजित पवारांना दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे बघणं महत्वाचं आहे.