breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

भाजपाविरोधी आघाडीसाठी राजकीय घडामोडींना वेग, तेलंगणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, दिग्गज नेते उपस्थित

मुंबई |

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षाचे आमदार, खासदार यांच्यासह अभिनेते प्रकाश राज देखील उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी पक्षांची आघाडीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे चंद्रशेखर राव यांच्यासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे देखील दिसले. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

बिगर-भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आलेत. भाजपविरोधात समविचारी पक्षांना संघटित करण्याबरोबरच पुढील दिशा निश्चित करण्यासाठी उभयतांमध्ये चर्चा झाली. शिवसेनेने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून भेटीला येण्याचे निमंत्रण दिले. ठाकरे यांच्या निमंत्रणानुसार राव मुंबईत आले आहेत. याबाबत तेलंगणच्या मुख्यमंत्री कार्यालयातून माहिती देण्यात आली.

  • चंद्रशेखर राव यांच्याकडून तमिळनाडू, पश्चि बंगालच्या मुख्यमंत्र्यांशीही संपर्क

ठाकरे यांनी चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण दिले आहे. राव यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानवर करण्यात आलेल्या लक्ष्यभेदी कारवाईच्या पुराव्याची मागणी राव यांनी अलीकडेच केली. तसेच भाजपच्या दडपशाहीविरोधात बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. माजी पंतप्रधान व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांनीही राव यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

  • बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नवी दिल्लीत बैठक होणार

बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा जाहीर केला आहे. घटनेने दिलेले राज्यांचे अधिकार कायम राहावेत, या मागणीसाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल ठाकरे यांनी राव यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

  • प्रादेशिक पक्षांची आघाडी?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होत आहे. ममता आणि राव या दोन मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसशी फारसे जमत नाही. केरळचे मुख्यमंत्री विजयन हे भाजपच्या विरोधात असले तरी त्यांना अजून या आघाडीत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचा राव यांचा प्रयत्न आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button