breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

वेध विधानसभा निवडणुकीचे : महाविकास आघाडीचा हडपसरचा उमेदवार ठरला; भोसरी मतदार संघात कोण?

राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याकडे लक्ष

पिंपरी : विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा आज पुण्यातील हडपसरमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. इथे बोलताना जयंत पाटील यांनी विधानसभेच्या उमेदवारीवर भाष्य केले आहे.

देशात यंदा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणूक होतील. या निवडणुकांमध्ये कुणाला उमदवारी मिळणार? याची सर्वत्र चर्चा होत आहे. अशात हडपसरमध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केले आहे. हडपसरमधून शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल? यावर त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. ‘‘एक लक्षात ठेवा…लोकं आजही आपल्यासोबत आहेत. त्यामुळे प्रशांत जगताप तुम्ही हडपसरमधून आरामात निवडून येऊ शकता’’, असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे हडपसर विधानसभेचा उमेदवार जाहीर करून टाकला.

दरम्यान, जयंत पाटील पुण्यातील मेळाव्यानंतर भोसरी विधानसभा मतदार संघाचा मेळावा घेण्यासाठी मोशी येथे दाखल झाले आहेत. हडपसर मतदार संघातील विधानसभा निवडणुकीचा उमेदवार अप्रत्यक्षपणे जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्ये संभाव्य उमेदवार कोण? याबाबत पाटील भाष्य करतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्याकडे लागले आहे. कारण, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट जोरात कामाला लागला असून, नोव्हेंबर- २०२४ मध्ये विधानसभा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबत शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीवर ‘फोकस’ केला आहे.

विलास लांडे, एकनाथ पवार, सुलभा उबाळे प्रमुख दावेदार…

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपाचे आमदार महेश लांडगे निवडून आले आहेत. त्यांचे प्रभावी प्रतिस्पर्धी माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार की शरद पवार याबाबत भूमिका घेतलेली नाही. मात्र, लांडे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे जाहीरपणे बोलले आहेत. लांडे यापुढे शरद पवार यांच्यासोबत राहीले, तर भोसरीचा महाविकास आघाडीचा उमेदवार तेच असतील. याउलट, लांडे अजित पवार यांच्यासोबत राहिल्यास महायुतीच्या जागावाटपामध्ये विद्यमान आमदार या नात्याने भोसरी मतदार संघ भाजपाला सोडावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लांडे आपला अंतिम पत्ता बाहेर काढतील, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे. परिणामी, भोसरी विधानसभेसह शिरुर लोकसभेमध्ये लांडे यांची भूमिका निर्णायक राहील, असे चित्र आहे. आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी शरद पवार गट आणखी ताकदीने लढणार आहे. त्यामुळे लांडे यांना राजकीय ‘लाईन ऑफ ॲक्शन’ निश्चित करावी लागणार आहे. दुसरीकडे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी २०१४ मध्ये या मतदार संघातून निवडणूक लढवली होती. तसेच शिवसेनेच्या माजी गटनेत्या सुलभा उबाळे यासुद्धा प्रमुख दावेदार राहणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये भोसरी मतदार संघ राष्ट्रवादीला सुटला, तर उमेदवार कोण असेल? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button