‘महिलांचे शेतीतील श्रम कमी करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन करावे’; कृषिमंत्री भरणे

अहिल्यानगर : शेतीच्या कामांशमध्ये महिला अग्रेसर आहेत. शेती कामातील महिलांचे श्रम कमी करण्यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करावे, तसेच शेतकऱ्यांच्या गरजेनुसार सुधारित वाण, हवामान अनुकूल तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण उपाय अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये (राहुरी) कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने ‘फुले कृषी महोत्सव-२०२६’, थेट पीक प्रात्यक्षिके, शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन कृषीमंत्री भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार प्राजक्त तनपुरे, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष तुषार पवार, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेच्या महासंचालक वर्षा लढ्ढा-उंटवाल, विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने आदी उपस्थित होते.
हेही वाचा – पुणेकरांवर कोणतीही करवाढ नाही ! सर्वसाधारण सभेत काय झाला निर्णय…
कृषीमंत्री भरणे म्हणाले, पेरणीपासून ते विपणनापर्यंत शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर मदत कशी करता येईल, यावर शासनाचा भर आहे. साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या मोटारीचे देयक शासनाने माफ केले आहे. यासाठी शासनाने ३१ हजार कोटी रुपये निधी दिला. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला असून शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग आणि आत्मा यंत्रणेने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले, शेतीवर परिणाम करणाऱ्या हवामान बदलावर मात करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विद्यापीठाचा भर आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विद्यापीठाच्या अद्ययावत तंत्रज्ञानाचे दालने सुरू करण्यात येणार आहेत. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले. यावेळी कृषीदर्शनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन, ‘फुले कृषी वाहिनी ९०.८ एफ.एम.’ युट्युब चॅनल, ‘फुले अमृतकाळ’ व ‘फुले डेअरी ॲप’चे लोकार्पण करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षाचे औचित्य साधून सविता नालकर व स्वाती शिंगाडे या प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा तसेच फळ संशोधन योजनेला उत्कृष्ट संशोधन प्रकल्पाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व योजनेच्या प्रमुख डॉ. सुमती दिघे यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कृषीमंत्री भरणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.



