Mhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रीय राज्यमंत्र्यांसह आजी-माजी आमदारांचे अर्ज
![Union Minister of State Bhagwat Karad's application for MHADA's house](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/mhada-lottery-2023-780x470.jpg)
मुंबई : मुंबई महामंडळाच्या घरांसाठी लोकप्रतिनिधींसाठीच्या राखीव प्रवर्गातून अर्ज केला जातो. दरम्यान, यासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज केला आहे. म्हाडाच्या ४०८२ घरांच्या सोडतीतील सर्वात महागड्या ताडदेवमधील साडेसात कोटी रूपये किंमतीच्या घरासाठी त्यांनी अर्ज केला आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी संकेत क्रमांक ४७० मधील उच्च उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केला आहे. ताडदेवमधील क्रीसेंट टॉवरमधील १४२.३० चौ. मीटर क्षेत्रफळाचे हे घर असून, त्या घराची किंमत सात कोटी ५७ लाख ९४ हजार २६७ रूपये आहे. या सोबतच आमदार आमश्या पाडवी, गडचिरोलीचे माजी आमदार हिरामण वरखडे, बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनीही अर्ज केले आहेत.
हेही वाचा – सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी २३ जुलै रोजी लेखी परीक्षा
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी एकूण पाच अर्ज दाखल केले आहेत. क्रीसेंट टॉवरमधील संकेत क्रमांक ४६९ मधील सात कोटी ५२ लाख ६१ हजार ६३१ रूपये किमतीच्या घरासाठी दोन अर्ज केले असून, एक अर्ज याच टॉवरमधील पाच कोटी ९३ लाख रूपये किमतीच्या घरासाठी आहे. पाचपैकी केवळ एक अर्ज लोकप्रतिनिधी प्रवर्गातून करण्यात आला आहे. माजी आमदार हिरामण वरखड यांनी तीन अर्ज केले आहेत. सर्व अर्ज अल्प उत्पन्न गटातील घरासाठी केले आहेत. तर आमदार आमश्या पाडवी यांनीही अल्प गटातील घरासाठी अर्ज केला आहे.