“मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही”; नितीन गडकरींचा इशारा

पुणे | देशाच्या ऊर्जा स्वावलंबनाच्या मार्गात पेट्रोलियम क्षेत्रातील लॉबी मोठा अडथळा ठरत असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केला. तसेच मी दंडुका घेऊनच बसतो, मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. ‘इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी’ (आयएफजीई) यांच्या वतीने आयोजित ‘कॉम्प्रेस्ड बायोगॅस कॉन्क्लेव्ह २०२६’च्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सुरू असलेल्या युद्धांमुळे ऊर्जा सुरक्षिततेचे महत्त्व अधिक वाढले आहे. भारत अजूनही मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आयातीवर अवलंबून असून सुमारे ८६ टक्के ऊर्जा गरजा आयातीतून भागवल्या जातात. यासाठी दरवर्षी जवळपास २२ लाख कोटी रुपये देशाबाहेर जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबन मिळवणे ही काळाची गरज आहे.
हेही वाचा : अमेरिका–इराण युद्धाचा परिणाम; देशात LPG सिलिंडर महाग
पर्यायी इंधनांच्या प्रसारात मोठ्या आर्थिक हितसंबंधांमुळे अडथळे येत असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले. पेट्रोलियम क्षेत्राशी संबंधित मोठी लॉबी या बदलाला सहजपणे स्वीकारणार नाही. देशातून दरवर्षी होणाऱ्या २२ लाख कोटी रुपयांच्या इंधन आयातीमुळे अनेकांचे आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. त्यामुळे पर्यायी इंधनांचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न होणे स्वाभाविक आहे. मात्र अशा दबावाला घाबरण्याचे कारण नाही, असं गडकरी म्हणाले.
आपल्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना गडकरी म्हणाले, मी दंडुका घेऊनच बसतो. मला मॅनेज करणारा अजून जन्माला आलेला नाही. मी त्यांना सरळ सांगतो, हे करा नाहीतर ठोकतो. त्यांच्या या वक्तव्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये हास्याची लाट उसळली. मात्र सरकार पर्यायी इंधनांच्या प्रसारासाठी ठाम असल्याचा संदेश त्यांनी दिला.





