breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मोदींना पाठिंबा देण्याचं पहिलं पाप शिवसेनेनं केलं’; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई | उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘लबाड’ असा उल्लेखही केला आहे. ‘सामना’साठी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची दोन भागांमध्ये घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रदर्शित झाला. या भागामध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसेनेतील फूट, एकनाथ शिंदेंची भूमिका व भाजपाचा या सगळ्यामधील सहभाग यावर भाष्य केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात माझे आजोबा पहिल्या पाच महत्त्वाच्या नेत्यांमधले अर्थात त्या ‘पंचक’मधले एक होते. तेव्हा माझे वडील, माझे काकाही त्या लढ्यात होते. तो लढा जेव्हा पेटला होता, तेव्हा मोरारजी देसाईंनी पोलिसांना आदेश दिले होते की ‘मी तुम्हाला बंदुकीच्या गोळ्या माणसांना मारायला दिल्या आहेत’. असं म्हणतात की तेव्हा त्यांनी गोळ्या किती झाडल्या आणि किती माणसं मारली गेली याचा हिशेब मागितला होता. ‘गोळ्या वाया का घालवल्या’ असा प्रश्न त्यांनी केला होता. चिंतामण देशमुख यांनी लोकसभेत पंडित नेहरूंना हा प्रश्न विचारला होता की ‘या गोळीबाराची तुम्ही न्यायालयीन चौकशी करा’. त्या चौकशीला नकार दिला तेव्हा देशमुखांनी त्यांना ठणकावलं होतं की ‘याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकस आहे. मी तुमच्या मंत्रीमंडळात राहू शकत नाही, हा घ्या माझा राजीनामा’. सध्या महाराष्ट्राबद्दलचा एवढा आकस समोर दिसत असूनही आता चिंतामणराव कुणीच दिसत नाही. सगळे लेचेपेचे लोटांगणवीर दिसत आहेत. तोच आकस हे आता काढत आहेत.

हेही वाचा      –      चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; ‘या’ नेत्यांमध्ये होणार स्पर्धा 

२०१४ साली मोदींच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा देण्याचं पहिलं पाप शिवसेनेनं केलं. मी ते पापच मानतो कारण आता ते आम्हाला संपवायला निघाले आहेत. ते सगळं स्वप्नवत होतं. पण त्याच वर्षी ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही असं कोणतं पाप केलं होतं की भाजपानं शिवसेनेशी युती तोडली. तेव्हा तर आम्ही काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा यांच्या मानेवर बसलेल्या औरंगजेबाच्या फॅनक्लबमध्ये नव्हतो. मग तुम्ही माझ्याशी युती का तोडली होती? एकनाथ खडसेंनीही सांगितलंय की त्यांना वरून आदेश आले होते की युती तोडल्याचं जाहीर करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

माझा पक्ष काढून घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये. विधानसभा अध्यक्षांनाही तो अधिकार नाही. माझं खुलं आव्हान आहे. आपण एक तारीख ठरवून महाराष्ट्राच्या जनतेला बोलवू. एकही पोलीस सोबत घ्यायचा नाही. मी जनतेच्या मध्ये येऊन उभा राहतो. निवडणूक आयुक्तांमध्ये तेवढं धाडस असेल तर त्यांनी तिथे यावं, या लबाडानं यावं आणि तिथे सगळ्यांच्या समोर मध्ये उभं राहून सांगावं पक्ष कुणाचा आहे ते. जो निर्णय जनता देईल तो मी मान्य करायला तयार आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीकास्र सोडलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button