‘एक ते भगत सिंग होते अन् हे एक..’; राज्यपालांच्या राजीनाम्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया

महापुरूषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे
सातारा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यपाल यांची बदली केली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांचाही समावेश आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या जागी आता रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर खासदार उदयनराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविषयी बोलताना उदयनराजे म्हणाले की, जसं राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, तसा राज्यपालही राज्याचा प्रमुख असतो. अशा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरूषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. महापुरूषांबद्दल वाईट बोललं तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतो. हे कशाला करता? जगात अनेक महाराजे होऊन गेले, पण शिवाजी महाराज आणि त्यांच्यात मोठा फरक होता. तो म्हणजे, ते महाराजे स्वत:च्या साम्राज्यासाठी लढले आणि आपल्या शिवाजी महाराजांनी युद्ध केलं ते लोकांसाठी केलं, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
महापुरूषांबद्दल बोलण्याची त्यांची विचारांची व्याप्ती संकुचित आहे. शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला आपलं कुटुंब मानलं. मात्र, आता अलीकडच्या काळात काही लोकांमध्ये अहंकार निर्माण झालाय. स्वत:चं व्यक्तिमत्व नसताना ते वाढवण्याचं काम करत आहेत. एक ते भगत सिंग होते, ज्यांनी देशासाठी प्राण पणाला लावले आणि दुर्दैवानं सांगावं वाटतं हे भगत सिंह आहेत, असं उदयनराजे म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेक लोक कल्याणकारी निर्णय घेतले. त्यांनी लोकशाहीची चौकट तयार केली. कारण लोकांचा राज्य कारभारामध्ये सहभाग असावा आणि त्यातूनच मग लोकशाहीची निर्मिती झाली, असं मत उदयनराजेंनी व्यक्त केलं.
आज जगात अनेक देश आहेत, जिथं आपल्याला राजेशाही पाहायला मिळते. पण, लोक त्या संपूर्ण प्रक्रियेत आले पाहिजेत म्हणून, छ. शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाची संकल्पना मांडली. कोणत्याही जाती-धर्मात मतभेद केले नाहीत. सर्वांना एकत्र ठेवण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलं, असंही उदयनराजे म्हणाले.




