महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंढ वाढ, कोणाची संपत्ती किती वाढली?

मुंबई | विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर २९ ऑक्टोबर पर्यंत अनेक इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. यामध्ये विद्यमान २७ मंत्र्यांचाही समावेश आहे. अनेक मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये थोडीबहुत वाढ झालेली दिसत आहे. यापैकी तीन मंत्र्याच्या संपत्तीत भरमसाठ वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या संपत्तीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या संपत्तीत ७७२ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१९ साली त्यांनी ३९ लाखांचे उत्पन्न दाखविले होते. यावेळी त्यांची संपत्ती ३.४ कोटींची असल्याचे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संपत्तीमध्ये ११७ टक्क्यांची वाढ झाली आहे. सात कोटींहून त्यांची संपत्ती १५.५ कोटींवर पोहोचली आहे.
हेही वाचा – ‘विधानसभेनंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार’; ICU मधून प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
मृदा आणि जल संधारण मंत्री संजय राठोड यांच्या संपत्तीतही २२० टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. २०१९ साली त्यांची संपत्ती ५.९ कोटी इतकी होती, ती आता १५.९ कोटी इतकी झाली आहे. युवक कल्याण आणि बंदर विकास मंत्री संजय बनसोड यांच्याही संपत्तीमध्ये १४४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यांनी यंदा पाच कोटींची संपत्ती जाहीर केली. छगन भुजबळ यांच्याही संपत्तीमध्ये १७ टक्के, तर हसन मुश्रीफ यांच्या संपत्तीत ३४ टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत किती वाढ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपत्तीमध्ये १८७ टक्क्यांची वाढ झाली. २०१९ साली त्यांची संपत्ती ७.८१ कोटी होती, आता ती वाढून २२.४ कोटी इतकी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीमध्ये ४४ टक्के तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपत्तीमध्ये ५६ टक्क्यांची वाढ झाली, अशी माहिती निवडणूक अर्जाबरोबर भरलेल्या शपथपत्रातून समोर येत आहे.





