चंद्रपूरमध्ये विजेच्या धक्क्याने वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू
- चंदनखेडा शेतशिवारातील घटना
चंद्रपूर |
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील वायगाव मार्गालगत असलेल्या शेतशिवारात आज ११ नोव्हेंबरच्या सकाळी वाघिणीचा मृतदेह आढळून आला. मृत वाघीण दोन ते अडीच वर्षांची आहे. वाघिणीच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी, विद्युत धक्क्याने वाघिणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चंदनखेडा शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघीण फिरत असल्याची चर्चा होती.
आज काही मजूर शेतात जात असताना त्यांना वाघिणीचा मृतदेह दिसला. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन.आर.प्रवीण यांच्याशी संपर्क साधला असता, जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने वाघिणीचा मृत्यू झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली. विशेष म्हणजे, दोन दिवसापूर्वीच वरोरा परिसरात एक वाघ शिकारीच्या शोधात विहिरीत पडला होता.
- १ ताब्यात, १ फरार
वाघीण मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी म्हणून शेतमजूर नीलकंठ गोविंदा दडमल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर शेतमालक गजेंद्र रणदिवे हा फरार आहे.