‘मुंबईतील या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे’; मंगल प्रभात लोढा

मुंबई : मालाडमध्ये उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी करणे शक्य झाले, याचे समाधान आहे. मालाड परिसरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.
येत्या काळात या केंद्राच्या माध्यमातून अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. या केंद्राला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे आणि त्यादृष्टीने लवकरात लवकर प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी सूचनाही लोढा यांनी यावेळी केली.
पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी येथे उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण ६ डिसेंबर २०२५ रोजी लोढा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा – संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टर, कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून ही सेवा पश्चिम उपनगरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी स्थानिक आमदार अस्लम शेख, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय आणि राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सहायक आयुक्त (पी उत्तर) कुंदन वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
या नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रामुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच आरोग्य केंद्रातून संदर्भित करण्यात येणारे रुग्ण महानगरपालिकेच्या प्रमुख, तसेच उपनगरीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करणे शक्य होईल. परिणामी, मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी मदत होईल.
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांसाठीची बाह्यरुग्ण सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या सुविधेसाठी प्रशस्त आसन व्यवस्था आणि प्रतीक्षा कक्ष उपलब्ध करण्यात आला आहे. दिवसाला २५० ते ३०० रुग्ण हाताळण्याची या बाह्यरुग्ण विभागाची क्षमता आहे. पाच मजली इमारतीतील तीन मजले कम्युनिटी मेडिसीन विभागासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. भविष्यात कर्मचारी संख्या वाढवतानाच अद्ययावत अशी हॉस्पिटल मॅनजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (HMIS) प्रणालीही अंमलात येणार आहे. वाचनालय, माहिती शिक्षण आणि संवाद सभागृह, सार्वजनिक आरोग्य संग्रहालय, संशोधन केंद्र, लसीकरण कक्ष आदी सुविधाही या ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत.





