‘…तर मी राहुल गांधींना १००० रूपये बक्षीस देणार’; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : लोकसभेचे विरोधीपक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी नुकताच हरियाणा राज्याच्या निवडणुकीत जवळापस २५ लाख बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला. त्यांनी पत्रकार परिषद घेत ब्राझीलच्या एका मॉडेलचे नाव आणि फोटो वापरून तब्बल २२ वेळा मतदान झालं असल्याचा दावा केला होता. राहुल गांधी यांचा हा हायड्रोजन बॉम्ब असल्याचं बोललं जात आहे. मात्र यावर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट राहुल गांधी यांनाच आव्हान दिलं आहे.
मुंबईत बोलत असताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘मी राहुल गांधी जर त्यांनी ते खोटं बोलत आहेत हे मान्य केलं तर त्यांना १००० रूपयांचं बक्षीस देईन. सर्व निवडणुकांमध्ये लोकसभेची मतदार यादी वापरली जाते हे त्यांना माहिती आहे. याच मतदार यादीच्या आधारावर महाराष्ट्रात त्यांचे ३१ खासदार निवडून आले. त्यावेळी त्यांनी मतदार याद्यांमधील दोषांवर बोट ठेवलं नाही.’
हेही वाचा – धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी; ग्रामस्थांकडून पूरपरिस्थितीची घेतली माहिती
बावनकुळे पुढे म्हणाले, ‘राहुल गांधी हे विधानसभा निवडणूक हरल्यानंतर मतदार याद्यांमध्ये दोष असल्याचं सांगत आहेत. ते चुकीचं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. राहुल गांधी हे सतत तीच डाळ शिजवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ती डाळ काही शिजत नाहीये. कोणीही त्यांना किंमत देत नाहीये. त्यांचा बिहार आणि महाराष्ट्रात सुफडा साफ होणार आहे. ज्यावेळी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितत होतं त्यावेळी ते स्वतःला वाचवण्यासाठी ते असे प्रयत्न करतात.’
बावनकुळे पुढे म्हणाले की, राहुल गांधी हे निवडणूक आयोगाला पुढं करून भाजपला टार्गेट करत आहेत. त्यामुळं भाजपला या प्रकरणामध्ये बोलावं लागतं. ते निवडणूक आयोगावर टीका करतात नंतर भाजपला टार्गेट करतात. आम्हाला निवडणूक आयोगाची पर्वा करण्याची गरज नाही. मात्र ते बोलतात असं की ते भाजपला टार्गेट करतात. त्यामुळं आम्हाला या प्रकरणामध्ये बोलावं लागतं. आता त्यांचे अस्तित्व त्यांच्या पक्षाचं अस्तित्व हे संपुष्टात येणार आहेत त्यामुळं ते हे बोलत आहेत.’




