“जग आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारताकडे मदत मागत आहे”; सरसंघचालक मोहन भागवत

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, जग आता त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी भारताकडे मदत मागत आहे. जयपूरमधील एसएमएस इनडोअर स्टेडियममध्ये दीनदयाळ स्मृती व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
या व्याख्यानमालेत बोलताना, मोहन भागवत यांनी नमूद केले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्मिक मानवतावादाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आजच्या काळातील गुंतागुंतीच्या गोष्टींना समजून घेण्यासाठी ते महत्त्वाचे आहे.
मोहन भागवत यांनी असेही म्हटले की, जग दर १५ वर्षांनी आपले आदर्श बदलते, परंतु भारताचा सनातन विचार शाश्वत आहे. “राष्ट्रवादामुळे युद्धे होतात, म्हणून जागतिक नेते आंतरराष्ट्रीय एकतेबद्दल बोलू लागले. पण जे आंतरराष्ट्रीय एकतेबद्दल बोलतात, ते त्यांच्या राष्ट्राचे हित सर्वोच्च स्थानी ठेवतात हे आपण पाहिले आहे. शक्तिशाली लोक जगण्यासाठी सर्वात जास्त संघर्ष करत आहेत. परिणामी, कमकुवत लोकांना याचा त्रास होत आहे. जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग आता भारताकडे मदत मागत आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – ‘परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मोहन भागवत यांनी पुढे असे म्हटले की, “मानवाने भौतिकदृष्ट्या मोठी प्रगती केली असली तरी अनेक नवीन आव्हाने निर्माण झाली आहेत. जितक्या औषधांचा शोध लागला आहे, तितकेच नवीन रोगही निर्माण झाले आहेत. तर, काही आजार औषधांमुळेच होत आहेत. मानवी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे, ज्यामुळे मानवजातीच्या अस्तित्वाबाबत चिंता निर्माण झाली आहे.”
यावेळी मोहन भागवत यांनी जागतिक असमानतेत वाढ होत चालली आहे यावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, “जगातील ४% लोकसंख्या ८०% उपलब्ध साधनांचा वापर करते, ज्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी आणखी वाढत चालली आहे.”
त्यांनी पर्यावरणाचा नाश आणि संकुचित राष्ट्रवादामुळे निर्माण होणाऱ्या संघर्षांकडेही लक्ष वेधले. “शक्तीशाली लोक लढतात, परंतु उर्वरित जगाला त्याचा त्रास सहन करावा लागतो”, असे त्यांनी म्हटले.
तत्पूर्वी गुरुवारी मोहन भागवत म्हणाले होते की, “देशाला समृद्ध आणि ‘विश्व गुरु’ बनवणे हे कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नाही. नेते, धोरणे, विविध पक्ष, सरकारे, विचार, महापुरुष आणि आरएसएस सारख्या संघटना यामध्ये योगदान देऊ शकतात. हे प्रत्येकाचे काम आहे आणि प्रत्येकाने त्यात सहभागी व्हायला पाहिजे.”




