breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारणराष्ट्रिय

देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते; खासदार संजय राऊत मोदी सरकारवर संतापले

मुंबई |

देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या देवांगना कलिता, नताशा नरवाल आणि आसिफ इक्बाल तन्हा या तीन विद्यार्थी आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. या तिघांना बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायद्यानव्ये (यूएपीए) गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. या प्रकरणावरून दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली. त्यामुळे राष्ट्रभक्तीचा मुद्दा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी याचं मुद्द्यावरून फ्रान्समधील नेते द गॉल याचं उदाहरण देत मोदी सरकार आणि भाजपाला सुनावलं आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून या राष्ट्रनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा या मुद्द्यावर भूमिका मांडली असून, सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे. “देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे. स्वामीनिष्ठा ही राजनिष्ठा असू शकते. पण त्यास देशभक्ती कसे म्हणाल? नताशा नरवाल, देवांगना कलिता या आंदोलकांना दिल्ली उच्च न्यायालयाने एक वर्षानंतर मुक्त करताना सरकारच्या मनसुब्यांवर ताशेरे ओढले. सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. त्याच वेळी केरळ हायकोर्टाने लक्षद्वीप बेटावरील सिनेनिर्मात्या आयशा सुल्ताना यांनाही अंतरिम जामीन मंजूर केला. लक्षद्वीपच्या राजकीय प्रशासकांवर टीका केल्याबद्दल आयशा यांच्यावरही राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आपल्या देशात राष्ट्रद्रोह इतका स्वस्त होईल असे वाटले नव्हते. स्वामीवर म्हणजे राजावर जो प्रेम करीत नाही तो राष्ट्रद्रोही या विचारावर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आसुड ओढले आहेत. सरकारविरुद्ध, पंतप्रधान, राष्ट्रपतींविरोधात बोलायचे नाही. तसे केले तर सरकार उलथविण्याचा कट रचला म्हणून खटले दाखल होतील. या भीतीवर सर्वोच्च न्यायालयाने उतारा दिला आहे,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला १८ कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button