breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमहिला दिनमुंबईराजकारणराष्ट्रिय

एकमेव आमदार अण्णा बनसोडेही शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात, आमदार बनसोडे कोणत्या पक्षातून आगामी निवडणूक लढविणार…

पिंपरी : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील एकमेव आमदार अण्णा बनसोडे यांची शिवसेना शिंदे गटाशी जवळीक वाढत चालली आहे. बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यास शहरातून ‘लोकप्रतिनिधीमुक्त राष्ट्रवादी’ होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे गेलेले सरकार, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील पराभव, गेल्या पाच वर्षांपासून महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करताना आलेले अपयश अशा विविध कारणांमुळे शहरात अस्तित्व ठेवण्यासाठी पक्षाची धडपड सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांच्या मागेपुढे करायचे आणि नेते जाताच पक्षाच्या स्थानिक पातळीवरील आंदोलनाकडे पाठ फिरविण्यात, गटबाजीत नेते धन्यता मानतात. गटबाजीतूनच पक्षाची शहरातील ताकद कमी झाल्याचे दिसून येते. मी २५ वर्षांपासून अजित पवारांच्या मार्गदर्शनखाली काम करत आहे. आता तरी मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट होती. आगामी निवडणूक राष्ट्रवादीकडूनच लढणार असल्याचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सांगितले आहे.

राज्यभरात पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा शहरावर एकछत्री अंमल होता. पिंपरी महापालिकेवर १५ वर्षे त्यांची एकहाती सत्ता होती. ‘दादा बोले आणि महापालिका डोले’ अशी परिस्थिती होती. सत्तेच्या माध्यमातून त्यांनी शहराचा कायापालट देखील केला. पण, राजकीय वातावरण बदलताच या बालेकिल्ल्याला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून तडे गेले. जवळच्या सहकाऱ्यांनी साथ सोडली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड आणि भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपक्षांना पुरस्कृत करण्याची वेळ आली होती. पिंपरी मतदारसंघात देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की पक्षावर ओढवली होती.

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपमधील नगरसेवकांचा राष्ट्रवादीकडे कल वाढला होता. परंतु, सत्ता जाताच चित्र पुन्हा बदलू लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे एकमेव आमदार बनसोडे हे मनाने पक्षापासून दूर असल्याचे दिसून येत आहे. ते पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाहीत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहर दौऱ्यावर असताना बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. या भेटीची राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू आहे.

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त?

बनसोडे हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते. शिवसनेकडे उमेदवारी मागत असल्याचे शिवसेना खासदारांनी जाहीर सभेत सांगितले होते. आता महाविकास आघाडीत ठाकरे गट आहे. शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे बनसोडे यांची शिंदे यांच्या शिवसेनेशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीवेळी देखील बनसोडे यांची भूमिका संभ्रम निर्माण करणारी राहिली. निवडणुकीदरम्यान बनसोडे यांनी शिवसेनेला साथ दिल्यास पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसमुक्त होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button