मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील कार्यालयात लागली पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाची पाटी!

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी अपघाती निधन झालं. तर, २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या आकस्मिक निधनानंतर राज्यात तीन दिवसांचा दुखवटाही पाळण्यात आला. तर, चौथ्या दिवशी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, आज मंत्रालयात अजित पवारांच्या दालनाबाहेर सुनेत्रा पवारांच्या नावाची पाटी लागली आहे.
मंत्रालयात मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्याचे दालन तसेच मुख्यमंत्री सचिवालय आहे. त्याला जोडूनच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दालने आणि कार्यालये आहेत. मुख्य सचिवांचे कार्यालयही याच मजल्यावर आहे. याच मजल्यावर अजित पवारांचे दालन आणि कार्यालय होते. त्यावर अजित पवारांच्या नावाची पाटी होती. मात्र, या पाटीवर आता सुनेत्रा पवारांचं नाव आलं आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात इतकी घाई का करण्यात आली? असा प्रश्न सातत्याने विचारला जातो. या प्रश्नावर आज सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “विलीनीकरण हा वेगळा विषय झाला. उपमुख्यमंत्रिपद आणि विधीमंडळ नेता निवडीत इतरांचा अधिकार काय? घाई का हा प्रश्नच का विचारला जातो? अजित पवारांची इच्छा काय होती? २०१९ ला ते भाजपासह गेले होते. ८० तासांचं सरकारही झालं होतं. दादांची इच्छा काय होती? दोन पक्षांचं सरकार स्थिर राहिल. २०२२ मध्येही ठरलं होतं की सगळे आमदार म्हणाले होते की भाजपासह गेलं पाहिजे. मी त्याच्या तपशीलांमध्ये जात नाही”, असंही सुनील तटकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘आदिवासी विकास योजनांची सर्वसमावेशक अंमलबजावणी करा’; मंत्री डॉ. अशोक वुईके
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच सुनेत्रा पवार कामाला लागल्या आहेत. सर्वांत आधी त्यांनी अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांना शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन सुनेत्रा पवारांनी दिले आणि त्यांची पत्नी संध्या जाधव यांचं सांत्वन केलं.
तंसच सुनेत्रा पवारांवर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी तीन खातीही देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही खाती सुनेत्रा पवारांना देण्यात आली. आता त्याही पुढे जाऊन अजित पवारांकडे असलेल्या आणखी दोन जबाबदाऱ्या सुनेत्रा पवारांना देण्यात आल्या आहेत. अजित पवारांकडे बीड आणि पुण्याचे पालकमंत्री पद होते. या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी आता सुनेत्रा पवारांकडे देण्यात आली आहे.




