शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल
![The morph video of Shinde group leader Sheetal Mhatre and MLA Prakash Surve went viral](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sheetal-mhatre-780x470.jpg)
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप करत तक्रार दाखल
मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅलीत सामील झाले होते. या रॅलीतील शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांचा व्हिडीओ मॉर्फ करून त्यावर अश्लील मजकूर करून व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेतून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या व्हायरल अश्लील व्हिडीओची माहिती मिळताच शिवसैनिकांनी दहिसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन रात्रभर गोंधळ घातला. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून घेतली आहे. पण विनयभंगासारखा गुन्हा दाखल करून असे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना अद्दल घडवावी अशी मागणी शिवसैनिकांनी करत पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. यासंदर्भात पोलीस कार्यवाही करत आहेत.
शीतल म्हात्रे यांनी ‘मातोश्री’ नावाच्या पेजवर हा व्हिडिओ मॉर्फ करून घाणेरडा मजकूर लिहून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत एकाला अटक केली. इतरांचाही पोलीस शोध घेत आहेत.
या प्रकरणावर शीतल म्हात्रे प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की, आज मी सुद्धा कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहिण आहे. विरोधाच्या घरीही महिला आहेत. अशा वेळी इतक्या खालच्या थराला जाऊन खोटे व्हिडीओ टाकणे, अश्लील संदेश टाकणे हा प्रकार अत्यंत वाईट आहे. विरोधक एखाद्या महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात हे दिसून येतंय. हा व्हिडीओ युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी.
राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत?? मातोश्री नावाच्या fb पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा morphed video upload करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?, असं शीतल म्हात्रे यांनी म्हटलं आहे.